नगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने नूतन पोलिस अधीक्षकांचा सत्कार

Nagar Police | वारकरी संप्रदायाचे सहिष्णुतेचे कार्य महान – पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे





नगर : दर्शक ।  महाराष्ट्राला संतांची आणि वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. हा संप्रदाय संपूर्ण जगाला मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि समतेचा संदेश देतो. वारकरी संप्रदायाचे कार्य हे केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन नगरचे नूतन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.



         नगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ अण्णा राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाच्या कार्याची, त्याच्या सामाजिक योगदानाची आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याची सांगड घालण्यात आली.



          कार्यक्रमावेळी बोलताना अधीक्षक घार्गे यांनी सांगितले की, “वारकरी संप्रदाय हे एक प्रबळ आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राने अनेक संत आणि विचारवंत दिले, ज्यांनी समाजाला एकात्मतेचा मार्ग दाखवला. पोलिस प्रशासनाच्या वतीने यापुढेही वारकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य दिले जाईल.”



          या प्रसंगी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ राऊत यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून संघामार्फत दिंडी व्यवस्थापन, वैद्यकीय शिबिरे, अन्नछत्र सेवा आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत.



          लवकरच येणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून जाणाऱ्या दिंड्यांच्या सुव्यवस्थेबाबतही चर्चा झाली. प्रशासनाच्या मदतीने दिंडी मार्ग, वाहतूक नियंत्रण, वीज व पाण्याच्या सोयी यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाला संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुभाष राऊत उपस्थित होते.



      वारकरी संप्रदाय आणि पोलीस प्रशासन यांची ही भावनिक आणि सेवाभावी सांगड ही सामाजिक सौहार्द आणि शिस्तबद्धतेचा एक आदर्श ठरावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.