भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महानगरपालिका कधी घेणार ? – सौ. स्वाती शिरसुल यांची मागणी
नगर : दर्शक
शहरात बिबट्या, वाघ यांच्या हल्ल्यांबरोबरच आता भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जीवघेणा ठरत असून, नागरिकांच्या सुरक्षेची स्थिती गंभीर झाल्याचे चित्र समोर येत आहे. पहाटे फिरायला जाणारे नागरिक, लहान मुले, महिला, वयोवृद्ध तसेच वाहनचालकांना भटके कुत्रे टोळक्याने हल्ले करून जखमी करत असून अनेकांना गंभीर इजा झाल्याच्या घटना वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर “बिबट्या-वाघापासून लोकांचे संरक्षण शासन करत आहे, मग भटक्या कुत्र्यांपासून संरक्षणाची जबाबदारी महानगरपालिका कधी घेणार?” असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वाती शिरसुल यांनी मनपाला केला आहे.
गेल्या काही महिन्यांत दिल्लीगेट, झेंडीगेट, बुरुडगाव, केडगाव, सावेडी, बोल्हेगाव आदी उपनगरांमध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, नागरिक दहशतीत दिवस काढत आहेत. शहराच्या रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी भागात हे कुत्रे मुक्तपणे फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. सिरसुल म्हणाल्या, “अलीकडे पुण्याचे आमदार महेशदादा लांडगे यांनी विधानसभेत हा विषय पोटतिडकीने मांडला. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे, याची राज्य सरकारनेही दखल घ्यावी. पण महानगरपालिका मात्र अद्याप निष्क्रिय आहे.”
भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नालेगाव येथील मनपाच्या आरक्षित जागेत पाच–सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून श्वानगृह बांधण्यात आले. येथे नसबंदी केलेल्या कुत्र्यांना ठेवण्याची व्यवस्था होती. मात्र, सध्या ते पूर्णपणे ओसाड असून एकही कुत्रा किंवा देखभाल कर्मचारी नाही, अशी धक्कादायक माहिती सौ. सिरसुल यांनी दिली.
फक्त जाळी उभारून, इमारत दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. कुत्र्यांना आश्रय देणे तर दूरच, पण श्वानगृहाची दैनंदिन देखभालसुद्धा होत नाही. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप त्यांनी केला.
काही श्वानप्रेमी संघटना भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करतात, त्यांना आहार देतात, परंतु हेच कुत्रे नागरिकांना चावून जखमी करतात; अगदी रेबीजसारख्या रोगाने मृत्यूही होतो. अशा वेळी याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांचा जीव महत्त्वाचा की कुत्र्यांच्या मुक्त संचाराला पाठबळ देणारे नियम?” असा प्रश्न सौ. सिरसुल यांनी उपस्थित केला.
सौ. सिरसुल यांनी मनपाला पुढील माहिती आवश्यकतेने जाहीर करण्याची मागणी केली आहे—
शहरात एकूण किती भटके कुत्रे आहेत?, आतापर्यंत किती कुत्र्यांची नसबंदी केली आहे?, श्वानगृहात सध्या किती कुत्रे ठेवलेले आहेत?, श्वानगृहात कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे का?
वाघ–बिबट्या असो किंवा भटके कुत्रे—लोकांच्या जीविताचे संरक्षण करणे हे शासन व महानगरपालिकेचे मूलभूत कर्तव्य आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात,” अशा शब्दांत सौ. स्वाती सिरसुल यांनी प्रशासनाला ठाम मागणी केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com