Top News

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून मतदान जनजागृतीची कलात्मक रांगोळी

 भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून मतदान जनजागृतीची कलात्मक रांगोळी

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून मतदान जनजागृतीची कलात्मक रांगोळी




नगर : दर्शक 

 आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे तसेच मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविला. शाळेच्या परिसरात विद्यार्थिनींनी कलात्मक व संदेशपूर्ण रांगोळी साकारत मतदान जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.



या रांगोळीमधून ‘मतदान करा’, ‘लोकशाहीचा उत्सव साजरा करा’, ‘प्रत्येक मत मौल्यवान आहे’ असे आशयपूर्ण संदेश चित्ररूपात मांडण्यात आले होते. रंगसंगती, रेखीव आकृत्या आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख मेळ साधत विद्यार्थिनींनी आपली कला आणि सामाजिक जाणीव यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. या उपक्रमामुळे शाळेतील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक चर्चा घडून आली.


या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजून घेतले. तसेच साकारलेल्या रांगोळीसमवेत अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे हा उपक्रम केवळ शालेय स्तरावर मर्यादित न राहता व्यापक जनजागृतीचे माध्यम ठरत असल्याचे चित्र दिसून आले.


या जनजागृती उपक्रमात निर्मिती साळुंके, प्रांजली सपाटे, ज्ञानेश्‍वरी कवाष्ठे, पूजा व्यवहारे, नवीका पितळे, आराध्या ढवळे, वैष्णवी निनाळा, जानवी आठरे, समृद्धी वाघचौरे, जानवी वाघ, संचिता काळे, पूर्वा कानडे या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. उल्हास दुगड, उपप्राचार्य श्री. कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, कल्पना पाठक, वैभव कुलकर्णी तसेच कलाशिक्षक राजकुमार बनसोडे, प्रवीण साळुंके व रांगोळी प्रमुख अर्चना चिदंबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शालेय स्तरावरूनच लोकशाही मूल्यांची रुजवणूक होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले.


भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या या उपक्रमामुळे ‘मतदान ही आपली जबाबदारी आहे’ हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने