मखदूम सोसायटी व जि.प.उर्दू शाळा फकीरवाडा यांच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
नगर : दर्शक |
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व जिल्हा परिषद उर्दू शाळा,
फकीरवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने “आपले शहर - आपले मतदान” या मतदार जनजागृती सप्ताह या उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती या विषयावर आधारित भेटकार्ड बनवा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
विद्यार्थ्यांनी “१०० टक्के मतदान” करण्यासाठी आपल्या पालकांना, नातेवाईकांना व परिसरातील नागरिकांना आवाहन करत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमावेळी मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापिका शेख अंजुम, दिलशाद शेख, सुम्मैया पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
आज आपण ज्या लोकशाही व्यवस्थेत स्वातंत्र्याने जगतो, त्या लोकशाहीचा पाया म्हणजे मतदानाचा हक्क. मतदान हा केवळ अधिकार नसून ती आपली नैतिक जबाबदारी आहे. देशाचे भविष्य घडवण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये दडलेली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या “आपले शहर – आपले मतदान” या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह अत्यंत प्रेरणादायी आहे. लहान वयातच लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे आणि आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार मतदार असणार आहेत.
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आपल्या पालकांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने कोणत्याही भीतीशिवाय, प्रलोभनाशिवाय आणि जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान केले पाहिजे.लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येकाने आवर्जून मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी सर्व नागरिकांना केले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com