भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर व जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव काते यांची निवड
नगर : दर्शक
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अहिल्यानगर शहर व जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव शंकर काते यांची निवड करण्यात आली आहे. दि. ८ जानेवारी २०२६ रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे पार पडलेल्या मुख्यमंत्री यांच्या उमेदवाराच्या भारतीय जनता पार्टी–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचार सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
साहेबराव काते हे भारस्कर कॉलनी, अप्पू हत्ती चौक, लालटाकी, अहिल्यानगर येथील रहिवासी असून गेल्या २५ वर्षांपासून ते समाजसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. ते बहुउद्देशीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच भारतीय लहुजी सेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब, मागासवर्गीय समाज, माता-भगिनी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे. दलित व मातंग समाजावर अन्याय-अत्याचार झाल्यास तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्रिय राहिले आहेत. यासाठी त्यांनी रास्ता रोको आंदोलने, उपोषणे, मोर्चे आयोजित केले असून आझाद मैदान व मंत्रालय, मुंबई येथेही कार्यकर्त्यांसह अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे.
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत दलित कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळवून देणे, अन्यायाच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात पाठपुरावा करणे, तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, ओबीसी विकास महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र आदींच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. मागासवर्गीय समाजातील कर्जमाफी प्रकरणांतही त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे.
याशिवाय सरकारी घरकुल योजनांचे काम, तसेच विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रांत व तहसील कार्यालयांवर मोर्चे नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर व जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com