Top News

समाज आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकदंत मंडळाचे योगदान उल्लेखनीय – डॉ. कुणाल रच्चा

 श्री एकदंत गणेश मंडळाच्यावतीने आरोग्य, नेत्र, दंत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

समाज आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  एकदंत मंडळाचे योगदान उल्लेखनीय – डॉ. कुणाल रच्चा




नगर : दर्शक ।
श्री गणेश जयंती निमित्त दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत औषध वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देत गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.


      या आरोग्य शिबिरात दंततज्ज्ञ डॉ. कुणाल रच्चा, डॉ. रत्ना बल्लाळ, डॉ. प्रशांत सुरकुटला, नेत्रतज्ज्ञ डॉ. आनंद बोज्जा व त्यांचे सहकारी वेदांत बोम्मादंडी, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. योगेश मंजे, डॉ. प्रताप वाळके, डॉ. अभय राठोड, डॉ. तनिष्क ठेंगडे, डॉ. विभूती फासाटे यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले. तपासणीनंतर सर्व रुग्णांना श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने मोफत औषधोपचार देण्यात आले.


      यावेळी बोलताना दंततज्ज्ञ डॉ. कुणाल रच्चा म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीत सर्वसामान्य नागरिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी लहान आजार गंभीर स्वरूप धारण करतात. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर उपचार या चार बाबी पाळल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. अशा परिस्थितीत श्री एकदंत गणेश मंडळाने गणेश जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेले आरोग्य, नेत्र, दंत व आयुर्वेदिक तपासणी शिबिर समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे.



     डॉ. रत्ना बल्लाळ म्हणाल्या की, फक्त आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हेच अशा शिबिरांचे खरे उद्दिष्ट असते. श्री एकदंत गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाज आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मंडळाचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.



       या शिबिरामध्ये नेत्र तपासणीद्वारे गरजू रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली असून आवश्यक रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावर्षी आयुर्वेदिक उपचार शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी नैसर्गिक उपचारपद्धती, आहार व जीवनशैलीबाबत रुग्णांना सविस्तर माहिती दिली.



     या आरोग्य शिबिरात एकूण ३७६ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना आवश्यक ते मोफत औषधोपचार देण्यात आले. दंत तपासणी शिबिरात ५७ रुग्णांची दंत तपासणी करण्यात आली. तसेच नेत्र तपासणी शिबिरात ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या रुग्णांवर पुणे येथील देसाई हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या माध्यमातून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.



    या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच एकदंत महिला बचत गटाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सुंकी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीनिवास बुरगुल यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने