शिक्षणासोबतच आरोग्य हे देखील समाज उन्नतीचे महत्त्वाचे माध्यम आहे - डॉ.अशफाक पटेल
नगर : दर्शक |
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हे फातेमा शेख यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.ज्या काळात महिलांना आणि विशेषत अल्पसंख्यांक समाजातील महिलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते, त्या काळात फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिक्षणाचा लढा दिला. त्यांच्या धैर्यामुळे आज अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा मिळाली आहे.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले हे सर्वरोग निदान शिबिर म्हणजे त्यांच्या विचारांना दिलेली खरी मानवंदना आहे. शिक्षणासोबतच आरोग्य हे देखील समाज उन्नतीचे महत्त्वाचे माध्यम आहे. निरोगी समाजाशिवाय सशक्त राष्ट्र उभे राहू शकत नाही.
फातिमा शेख यांचे विचार आत्मसात करून आपण शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेतून समाजासाठी कार्य करत राहू, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी श्रद्धांजली ठरेल.असे प्रतिपादन प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग तज्ञ डॉ अशफाक पटेल यांनी केले.
अल करम हॉस्पिटल व मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका क्रांतीज्योती फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अल करम हॉस्पिटल येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरात प्रसिद्ध फिजीशियन डायबेटोलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशफाक पटेल यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. तपासणी झालेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधेही वितरित करण्यात आली.
यावेळी तौफिक तांबोली, शेरअली शेख, आबीद दुलेखान यांच्यासह सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फातिमा शेख यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले असून त्यांच्या विचारांना आरोग्यसेवेतून पुढे नेण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सुत्रसंचालन आबीद खान यांनी केले.तर आभार तौफिक तांबोली यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com