Top News

निवडणुकीच्या निकालानंतर नालेगावमध्ये राडा

 निवडणुकीच्या निकालानंतर नालेगावमध्ये राडा

निवडणुकीच्या निकालानंतर नालेगावमध्ये राडा
                                                                  (news image file)



महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नालेगावमध्ये चांगलाच राडा झाला. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्याच्या घरासमोर जावून घोषणाबाजी केली. त्यातून कवडे आणि वाघ समर्थकांमध्ये वादावादी झाली. या घटनेमुळे नालेगाव परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील नालेगाव परिसरातील लांडे गल्लीत शुक्रवारी रात्री आपसात वादावादी करणाऱ्या चार जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 16 जानेवारी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर प्रभाग 11 मधील विजयी उमेदराच्या समर्थकांनी जल्लोष केला. तसेच भाजप पराभूत उमेदवाराच्या कट्टर समर्थकाच्या घरासमोर जावून विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. तेथूनच वातावरण तापले.


 दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमने सामने आल्याने नालेगावमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नालेगाव येथील लांडे गल्लीत काही तरुण आपसात भांडण करत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला मिळाली होती. 


या माहितीवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सूरज कदम व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी चार जण एकमेकांच्या अंगावर धावून जात वादावादी करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.


अखेर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्यांची चौकशी केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने