Top News

New Arts College | जोतिबा समजून घेतले तर सावित्री होता येईल - प्रा. स्नेहा गायकवाड

‘न्यू आर्ट्स’ मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी





नगर : दर्शक । 
 एक जोतिबा होते, ज्यांनी एक सावित्री घडवली. एका सावित्रीने अनेक सावित्री घडवल्या. आज आपण सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमान बाळगतो त्याचे श्रेय फुले दाम्पत्याला जाते. जोतिबा होते म्हणून सावित्रीबाई घडल्या, तसेच आधुनिक काळात पुरूषांकडून जोतिबांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळाले तर प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली सावित्री बाहेर येईल. फुलेंचा सत्यशोधक विचार सत्य वर्तन, सत्य आचरण आणि तत्त्वज्ञान दृष्टी जोपासणारा आहे. आधुनिक काळात घडणाऱ्या घटना पाहता फुलेंच्या शिक्षण, समानता, न्याय अशा अनेक विचारांची गरज आजही भासते. त्यामुळे आधी जोतिबा समजून घ्या तर सावित्री होता येईल, असे प्रतिपादन प्रा. स्नेहा गायकवाड यांनी केले.


 
       शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्यासह सहसचिव मुकेश मुळे व विश्वस्त जयंत वाघ उपस्थित होते. विश्वस्त अरुणाताई काळे, निर्मलाताई काटे, अलकाताई जंगले, कल्पनाताई वायकर आदी संस्था सदस्या उपस्थित होत्या. त्यांच्यासह प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, प्रबंधक बबन साबळे, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याच्या कार्याध्यक्षा प्रा. सविता शेळके, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या अधिक्षिका डॉ. सुनीता मोटे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 


      प्रा. गायकवाड यांनी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनक्रम सांगून त्यांनी केलेले समाजसुधारणेचे कार्य अधोरेखित केले. आधुनिक काळातील आव्हाने सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना सत्यशोधक विचार समजून घेण्याचे आवाहन केले. ‘कमवा व शिका’ योजना विद्यार्थीदशेत स्वावलंबी बनवणारी आहे.  त्याची लाज न बाळगता अभिमानाने काम करून शिकावे. शिक्षणामुळे रोजगारक्षम होता आले नाही तर शिक्षण फक्त बोलघेवडेपणा राहील, असे त्या म्हणाल्या.


 फुले कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय होता, परंतु व्यावसायिक वृत्तीपेक्षा त्यांनी समाज महत्त्वाचा मानला. आपण देखील त्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांविषयी संवेदनशील राहिले पाहिजे. मी पदाने कोण आहे, यापेक्षा माणूस म्हणून मी कसा आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. महापुरुषांना जातीपातीत न विभागता, खुद्द महापुरुषांनी जात सोडून सर्वसमावेशक विचार केला ही बाब लक्षात घ्यावी. विचारांमध्ये देखील काळाशी सुसंगत बदल करा, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले. 

     संस्थचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा देत महिलांना आणखी प्रगती करण्याची प्रेरणा दिली. तसेच संस्थेच्या सदस्या अरुणाताई काळे, अलकाताई जंगले, कल्पना वायकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांनी सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवनकार्य, त्यांनी केलेला संघर्ष यांचे फलित म्हणून आज आपण सर्व जण प्रगतीच्या वाटेवर आहोत, असे सांगितले.



      दरम्यान, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रांगणात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांच्या पोषाखात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यांच्यासह प्राध्यापिका व विद्यार्थिनी यांची रॅली काढण्यात आली. 


महिला सबलिकरण व सक्षमिकरण करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. जयंतीनिमित्त विशेष पथनाट्य सादर करण्यात आले. ‘सावित्री, अजून बरंच काही बाकी आहे’ हे पथनाट्य फुले दाम्पत्याचे कार्य दाखवून आधुनिक काळात देखील महिलांना सक्षम होण्याची गरज दाखवणारे होते. सावित्रीबाई फुलेंचा वैचारिक वारसा, चांगले शिक्षण असताना मुली-महिलांनी अन्याय सहज करू नये, असा संदेश अतिशय प्रभावीपणे या पथनाट्यातून देण्यात आला. 


सर्व मान्यवरांनी या पथनाट्याचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंती विशेष पुरस्कार यावेळी देण्यात आले. कला-संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरी शहाजी गदादे तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साक्षी त्र्यंबक जाधव या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले.  याशिवाय सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्याचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या ह्स्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक  साक्षी उंदरे हिने तर द्वितीय क्रमांक तनुजा सुभाष सोनवणे हिने पटकावला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्रद्धा प्रकाश कटके तर दिव्यानी कायल पंडित व निधी हिरालाल चेन्नुर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.  



       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री तोडकरी यांनी व प्रा. देवकी ढोकणे यांनी केले. आभार प्रा. सुनिता मोटे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक-प्राध्यापिका यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने