Rotary Club | समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – रो. अनुराधा विश्वासराव आठरे
नगर : दर्शक ।
अपघातांमध्ये हात गमावलेल्या व्यक्तींना बॅटरीवर चालणारा यांत्रिकी कृत्रिम हात बसविल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे, त्यामुळे समाजातील अशा गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा मा. अनुराधा विश्वासराव आठरे यांनी केले.
इनाली फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊन व राष्ट्रीय सेवा योजना, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित ‘बॅटरीवर चालणारा यांत्रिकी कृत्रिम हात मोफत वितरण शिबिराच्या’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. समाजातील दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी आपण एकत्र येऊन सकारात्मक पाऊले उचलली पाहिजेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते व या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हा क्लब सतत करत असतो असे प्रतिपादन रोटरीच्या सचिव मा. रो. आश्लेषा भांडारकर यांनी याप्रसंगी केले.
न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाबरोबरच महाविद्यालयातील विविध विभागांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांमध्ये जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सतत केले जाते. महाविद्यालयामध्ये दृष्टी आव्हानीत दिव्यांग केंद्राची स्थापना करण्यात आलेली असून या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील बेचाळीस दिव्यांग विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.
महाविद्यालय व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था शिक्षणाच्या माध्यमातून सतत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी इनाली फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी व रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊन यांचे विशेष आभार मानले व भविष्यकाळात देखील अशा उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली. संस्थेचे सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी सदर शिबिरास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊनचे माजी अध्यक्ष मा शब्बीर जामनगरवाला, सदस्य मा गौतम इदनानी, ईनाली फाऊंडेशनच्या टेक्निकल टीमचे श्री शिवा माने, श्री अभिषेक खिंगरे, श्री जमीर पठाण, श्री सिद्धार्थ साकरे उपस्थित होते, तसेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या माजी अध्यक्षा रो. मीनल बोरा, रो. लता भगत, रो. सविता काळे व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरादरम्यान एकूण २८ व्यक्तींना यांत्रिकी कृत्रिम हाताचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. गणेश निमसे यांनी अतिथी परिचय व स्वागत, डॉ. नयना कडाळे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. भगवान कुंभार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com