(Rutuja Photo Ahmednagar)
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव होळकर यांना विशेष निमंत्रित केले असल्याचेही प्राध्यापक शिंदे यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव साजरा होणार आहे. शासनाने या महोत्सवासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवातील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राध्यापक आमदार शिंदे व ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झाली. त्याची माहिती प्राध्यापक शिंदे यांनी माध्यमांना दिली.
31 मे रोजी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज यशवंत राजे होळकर हे चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासंदर्भातील नियोजनाबाबतचा अहवाल येत्या तीन दिवसात सर्व संबंधित अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा नियोजन आढावा बैठक होणार आहे, असे सांगून प्राध्यापक शिंदे म्हणाले, चौंडी येथे त्या दिवशी वाहनांना कोणतीही अडचण येणार नाही याचे नियोजन केले जाणार आहे तसेच खारघरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांसाठी तेथे भव्य मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, कुलर यासह अन्य आवश्यक सुविधा केली जाणार आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राज्य शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्याचे नियोजन आहे, असेही प्राध्यापक शिंदे यांनी सांगितले.
एखाद्या योजनेची सुरुवात अपेक्षित
31 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा होणार असून यावेळी राज्य सरकारच्यावतीने एखाद्या सार्वजनिक सुविधेचे भूमिपूजन व एखाद्या नव्या योजनेची सुरुवात यावेळी होण्याची अपेक्षा आहे व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही प्राध्यापक शिंदे यांनी सांगितले.
-----
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com