सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्पर्धेत प्रथम वैशाली सुरम, द्वितीय शिल्पा इपलपेल्ली , तृतीय वृषाली सामलेटी
नगर : दर्शक ।
दत कॉलनी दातरंगे मळा येथे श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंती उत्सवानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. रेणुका जिंदम आणि सौ. गायत्री महामुनी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत वैशाली सुरम यांनी प्रथम क्रमांक, शिल्पा इपलपेल्ली यांनी द्वितीय क्रमांक तर वृषाली सामलेटी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच मोहिनी गुंडू आणि सुनंदा इपलपेल्ली यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या कल्पकतेचे आणि पाककला सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
ट्रस्ट चे दीपक गुंडू यांनी सांगितले की महिलांना त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि दैनंदिन व्यापातून थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी दत्त जयंती उत्सवाचे २३ वे वर्ष असून प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्त जयंती उत्सवात रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, डान्स स्पर्धा, सामुदायिक विवाह सोहळा, कीर्तन-भजन, मनोरंजन नाटक, लहान मुलांसाठी खेळ, धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व भव्य मिरवणुकीचा समावेश असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम बुरा यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सब्बन यांनी केले. महिलांना प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा उपक्रम म्हणून या पाककला स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com