Bhagyodaya School Nagar | भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन उत्साहात संपन्न
Bhagyodaya School Nagar | नगर : दर्शक
भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित, विज्ञान व पर्यावरण विषयक भव्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक तसेच शैक्षणिक मॉडेल्स सादर करून आपली सृजनशीलता, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदर्शित केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संहीपाणी अकॅडमीचे संचालक डॉ. बालराजू कर्री यांनी आपल्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
डॉ. कर्री म्हणाले, ज्ञानाचा योग्य उपयोग म्हणजे विज्ञान. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा प्रभाव दिसतो. ससा आणि कासवाच्या गोष्टीसह शास्त्रज्ञांच्या धैर्यशील प्रयोगांची उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, ‘जो प्रयत्न आपण यश मिळेपर्यंत थांबत नाही, त्यालाच यशस्वी व्यक्ती म्हणतात.’ नावाजलेल्या शास्त्रज्ञांनी हजारो वेळा प्रयोग केल्यानंतरच बल्ब तेवत ठेवण्याचा शोध लावला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची सवय ठेवावी.
तसेच त्यांनी पालकांना संदेश दिला की, मुलांची तुलना इतरांशी करण्याची वृत्ती टाळावी. प्रत्येक मुलामध्ये स्वतंत्र कला, गुण आणि क्षमता असते. ती ओळखून त्यांना पाठबळ दिल्यास ते नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात. जोपर्यंत आपण स्वतः हार मानत नाही तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही. इच्छाशक्ती दृढ असेल तर प्रयत्नांना देवही सहाय्य करतो, असे त्यांनी सांगितले. अहंकार हा पराभवाचे मूळ कारण असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नम्रतेतून, सातत्यातून आणि परिश्रमातून यश मिळवण्याचा मंत्र दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानदेव बेरड होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भाग्योदय विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम, स्पर्धा, प्रात्यक्षिके व सहशालेय कार्यक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे कृती-आधारित शिक्षणाची गरज वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणात वापरली जात आहे आणि विद्यार्थीही या तंत्रज्ञानाशी वेगाने जुळवून घेत आहेत. अशा प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता वाढते, त्यांचे निरीक्षण कौशल्य विकसित होते आणि विज्ञान विषयावरील रुची दृढ होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, मानव शरीररचना, अवकाश विज्ञान, पाणी संवर्धन, गणितीय सिद्धांत, कृषी तंत्रज्ञान, रोबोटिक्स, भूकंप विज्ञान, स्मार्ट व्हिलेज मॉडेल्स अशी अनेक आकर्षक मांडणी केली होती. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये रेणुका माता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, माजी विद्यार्थी मनोज पवार, भावना आहेर, पालक प्रतिनिधी अरविंद मैड, डॉ. गोविंद कदम, रामदास साबळे इत्यादींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरक्ष कांडेकर यांनी अत्यंत सुटसुटीतपणे केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी दत्तात्रय पांडुळे यांनी समर्थपणे पार पाडली. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सोपान तोडमल, बाबासाहेब कोतकर, धनंजय बारगळ, संतोष काकडे, एकनाथ होले, शिवाजी धस, आदिनाथ ठुबे, रूपाली शिंदे, सुनीता मेढे, गणेश गायकवाड, बाळू कावरे, सुधाकर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला नवी दिशा मिळाली असून, विद्यालयाचा हा उपक्रम पालक आणि समाजामध्येही प्रशंसा मिळवत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com