Nagar Shivsena | अनंत गारदेंचा समर्थकांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश
Nagar Shivsena | माजी नगरसेवक गणेश वामन पुन्हा सक्रिय
नगर : दर्शक
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ठाकरे शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापार व उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. महानगर प्रमुख किरण काळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, संजय कांबळे, प्रतीक बारसे, आकाश आल्हाट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. माळी समाज, ओबीसी घटकाचे प्रतिनिधित्व करणारे अनंत गारदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या प्रभाग ११ मध्ये ते कार्यरत आहेत. गारदे यांची मागील आठवड्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यां समवेत काळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे बैठक झाली होती. त्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
निवडीनंतर गारदे म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे, महानगर प्रमुख काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी मशाल हाती घेतली आहे. अनेक दशक शहरा मध्ये शिवसेनेने सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी घेत शहरात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी काम करणार आहे.
माजी नगरसेवक वामन पुन्हा सक्रिय :
नालेगाव भागातील वजनदार प्रस्थ असणाऱ्या माजी नगरसेवक गणेश वामन पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. माजी मंत्री दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचे खंदे समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. शिवसेनेच्या तिकिटावर नालेगावचा समावेश असणाऱ्या प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शहराच्या कानाकोपऱ्यात त्यांनी शाखा स्थापन केल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे ते राजकारणापासून अनेक वर्ष दूर होते. किरण काळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या मुलाखतींना हजेरी लावली आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत प्रभाग ११ मधून ते शिवसेनेकडून मैदानात उतरणार काय या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com