इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दळवी, महानगर प्रमुख काळेंचे आवाहन
नगर : दर्शक ।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार, शिवसैनिकांच्या मुलाखती येत्या गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरात उत्साहात पार पडणार आहेत. यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. त्यातच आता ठाकरे शिवसेनेने पुढील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. ४ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता सावेडीच्या कोहिनूर मंगल कार्यालयात या मुलाखती पार पडणार आहेत. प्रसिद्धी पत्रकार द्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेते तथा प्रवक्ते खा.संजय राऊत, संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती पार पडतील. यावेळी प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल. दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महानगरपालिका क्षेत्रातील १७ प्रभाग, जिल्हा परिषदेचे ४४ गट, पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी यावेळी इच्छुकांच्या मुलाखती होतील.
नाव नोंदणी आवश्यक : शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी अहिल्यानगर शिवसेनेच्या ९९२२९१४२६४ या संपर्क क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com