Snehalay | निंबळक–इसळक परिसरात बिबट्याचा कहर ; वनविभागाचे "बोकड तुम्ही आणा" पर्यंत विचित्र उत्तरे
%20(1).jpeg)
स्नेहालयच्या संवेदनशील प्रकल्पांतील 400 अनाथ व निराधार बालके व महिलांच्या जीवितास गंभीर धोका – प्रशासनाकडून दुर्लक्ष?
अहिल्यानगर (ता. नगर) —दि. ४ डिसेंबर २०२५ निंबळक–इसळक परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असून, या भागातील नागरिक, शेतकरी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या स्नेहालय संस्थेच्या विस्तीर्ण प्रकल्प क्षेत्रात बिबट्याचे वारंवार दर्शन, पाऊलखुणा आणि प्रत्यक्ष हल्ला या घटनांनी परिस्थिती धोक्याच्या टोकाला नेली आहे. या सगळ्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
40 वर्षांपासून मानवसेवेत कार्यरत स्नेहालय; 45 एकरात संवेदनशील प्रकल्प निंबळक–इसळक येथील गट क्रमांक 201/2/2 या 45 एकर क्षेत्रात स्नेहालय संस्था मागील चार दशकांपासून हक्कवंचित, एचआयव्ही बाधित महिला, उपेक्षित व अनाथ बालके, तसेच रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णांचे पुनर्वसन करते.
या विस्तृत प्रकल्पात —
पाणी फाउंडेशनचे 6 एकरचे डेमो प्लॉट: भाजीपाला, मका, गोड ज्वारी आदी पिकांचे प्रात्यक्षिक प्रयोग; राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांचे नियमित प्रशिक्षण, स्नेहस्पर्श बालगृह: 140 बालकांचे संगोपन, मानसग्राम: रस्त्यावरून आणलेल्या 80 मानसिक रुग्णांचे पुनर्वसन, या सर्व कारणांमुळे दररोज 300–400 लोकांचे वास्तव्य आणि येणे–जाणे या परिसरात असते. यामुळे बिबट्याच्या वाढत्या उपस्थितीचा धोका शेकडो पटींनी वाढतो.
शेजारील कोतकर यांच्या ८ वर्षीय मुलावर रक्तथरकप हल्ला
निंबळक येथील कोतकर वस्तीतील राजवीर या ८ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक झडप घातली.
अंगावर शहारे आणणाऱ्या या हल्ल्यात मुलाने आरडाओरड करून स्वतःची सुटका केली, परंतु तो गंभीर जखमी झाला. ही घटना स्नेहालय प्रकल्पाच्या अगदी काहीच अंतरावर घडल्याने, बालगृहातील 140 लहान मुलांसह मनोरुग्ण आणि महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न अधिकच चिघळला आहे.
वनविभागाचे वारंवार दुर्लक्ष; "फोटो काढून पाठवा" पासून "बोकड तुम्ही आणा"पर्यंत विचित्र उत्तरे
स्नेहालयचे कार्यकर्ते रमाकांत दोड्डी, चंद्रकांत शेंबडे, मीरेन गायकवाड सांगतात —मागील एका महिन्यात किमान तीन वेळा बिबट्याचे दर्शन, स्पष्ट पाऊलखुणा आणि प्रत्यक्ष वावर दिसून आला. याबाबत उपवनसंरक्षक धोत्रे, गायकवाड, व सावीटल या अधिकाऱ्यांना फोन, संदेश व पत्राद्वारे वारंवार कळवले, मात्र प्रतिसाद धक्कादायक —फोन अनेकदा लागतच नाही, प्रतिक्रिया — "फोटो काढून पाठवा, मग कारवाई करू"
पिंजरा लावण्यासाठी सूचना — "बोकड व कोंबडा तुमच्या पैशाने आणा"
प्रत्यक्षात कोणतीही तातडीची, प्रभावी कारवाई नाही.
स्थानिक नागरिक व संस्थेचे कार्यकर्ते संताप व्यक्त करत म्हणाले —
“अजून एखादी दुर्घटना घडली तर त्यास पूर्ण जबाबदार वन अधिकारी असतील.”
बालकं, महिला आणि मानसिक रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; अंधारानंतर हालचाल बंद
बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात —
रात्रीचे शेतकाम थांबले
मुलांच्या खेळण्यावर मर्यादा
प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती
मानसिक रुग्णांच्या सुरक्षेबाबत सातत्याने धोका
स्नेहालयसारख्या संवेदनशील केंद्राजवळ असा धोका परिस्थितीच्या गंभीरतेचा पुरेपूर अंदाज देतो.
स्थानिकांची ठोस मागणी — तातडीची कारवाई हवीच!
1. त्वरित पिंजरे व प्रशिक्षित पथक तैनात करावे
2. थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचे निरीक्षण वाढवावे
3. स्नेहालय परिसर विशेष संरक्षित क्षेत्र घोषित करावे
4. निष्काळजी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी
5. फेन्सिंग, प्रकाशयोजना, सेन्सर कॅमेरे, रात्रीची गस्त यांसारखे स्थायी उपाय
स्नेहालयचे आवाहन: “मानवजीवनाला प्राधान्य द्या”
संस्थेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट इशारा दिला —
“आम्ही महिला, मुले आणि रुग्णांना आधार देण्यासाठी कार्यरत आहोत. प्रशासनाने दुर्लक्ष केले तर या भागात कधीही गंभीर शोकांतिका घडू शकते. तातडीने ठोस कृती करावी.” अन्यथा याविरुद्ध एक मोठे आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया स्नेहालयाचे पालक मिलिंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
निंबळक–इसळक परिसरातील बिबट्याचा वावर हा फक्त वन्यजीवांचा प्रश्न नाही,तर संवेदनशील आणि असुरक्षित मानवसमूहाच्या सुरक्षेचा गंभीर सामाजिक मुद्दा बनला आहे.वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती स्नेहालयाचे अध्यक्ष जयाताई जोगदंड यांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com