मन, बुद्धी व शरीर यांचा समन्वय साधला तर आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही - दिपाली वढावकर
Dr.Paulbudhe College: अहमदनगर (प्रतिनिधी) - मन, बुद्धी व शरीर यांचा समन्वय साधला तर आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी ध्येय निश्चिय करुन प्रयत्न केल्यास कार्यपुर्ती साधली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले लक्ष निश्चित करुन त्यादृष्टीने मार्गक्रमण केले पाहिजे. उपलब्ध परिस्थितीची सकारात्मक उपयोग करत आपला विकास साधावा. अभ्यासाबरोबरच करिअरबाबतच्या महत्वकांक्षा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असते.
विद्यार्थी दशेत मन आणि बुद्धी यात द्वंद सुरु असते. त्यामुळे मन शांत ठेवून बुद्धीचा उपयोग केल्यास कोणतीही अडचण राहत नाही. पालकांच्या अपेक्षा, मित्र परिवार, कॉलेज, करिअर यामध्ये विद्यार्थ्यांची मन भरकटत असते. त्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान-धारणा केल्यास आपले मन स्थिर होते. मन स्थिर असले की अनेक समस्यांचे निराकरण होते. अवास्तव महत्वकांक्षा न बाळगता आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करा, यश निश्चित मिळेल, असे मौलिक विचार मन:शक्ती केंद्राच्या दिपाली वढावकर यांनी व्यक्त केले.
वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये लोणावळा येथील मन:शक्ती केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘तारुण्यातील महत्वकांक्षा व तणावमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी केंद्राच्या दिपाली वढावकर, मनिषा बनकर, सुमन पालकर व श्री.आडगांवकर आदि साधकांसह संस्थेचे सचिव आर.ए.देशमुख, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.निलेश जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, अभ्यास व करिअरबाबतच्या विचाराने त्यांच्यात तणाव निर्माण होत असतो. यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी लोणावळा येथील मन:शांती केंद्राच्या साधकांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. साधकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. कॉलेजच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी असे उपक्रम नियमित राबविले जात असल्याचे सांगितले.
यावेळी मन:शक्ती केंद्राच्यावतीने प्रसारित केलेल्या पुस्तके, मासिक इत्यादींना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा मुंदडा यांनी केले तर आभार अनुराधा चव्हाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com