विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेंकडे रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ; शहर विकासाला बळ देण्याचे किरण काळेंचे साकडे
अ.नगर : अनेक वर्षांपासून अहिल्यानगर एमआयडीसीचा विस्तार रखडला आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसीचा विस्तार होणे गरजेचे आहे. युवकांच्या रोजगारासाठी मोठया कंपन्या शहरात आणण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या अहिल्यानगर शहरात याव्यात यासाठी आपण जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने सभापती पदाच्या माध्यमातून विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय समितीच्या वतीने माऊली सभागृह येथे शिंदे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काळे यांनी शिंदे यांना एमआयडीसीच्या विस्तार आणि विकासाबाबत पत्र देत मागणी केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
किरण काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, दरवर्षी हजारो तरुण-तरुणी शिक्षण, रोजगाराच्या संधीच्या शोधात शहरातून देशाच्या अन्य भागांमध्ये स्थलांतर करतात. कालांतराने त्याचे रूपांतर कायमस्वरूपी स्थलांतरामध्ये होते. शहर विकासाची व्यापार व उद्योग ही दोन चाकं आहेत. उद्योग वाढीला चालना मिळावी, लघुउद्योजकांना संधी मिळावी, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी एमआयडीसीचे बळकटीकरण आवश्यक आहे. यासाठी प्रा. शिंदे यांनी आपल्या सभापती पदाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांशी चर्चा करावी.
कार्गो व प्रवासी विमानतळ उभारणी करा :
सुमारे दहा वर्षांपूर्वी नगर - दौंड रस्त्यालगत असणाऱ्या कोरडवाहू भागामध्ये एमआयडीसी विस्तारीकरणासाठीचे सर्वेक्षण तत्कालीन सरकारने केले होते. या परिसरात सलग टेबल लँड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या ठिकाणी मुळा डॅम येथून पाणी देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आणणे शक्य आहे. मोठ्या उद्योगांसाठी कार्गो विमानतळ, प्रवासी विमानतळ या ठिकाणी उभारले जाऊ शकते. या माध्यमातून अ.नगर शहर हे देश, जगाशी हवाई मार्गाद्वारे जोडले जाईल, असे काळे यांनी म्हटले आहे.
आयटी पार्क एसईझेड उभा करा :
पुणे, मुंबईकडे न जाता युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी मिळण्याकरिता आयटी पार्कसाठी विशेष स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) उभा करणे कामी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय होण्यासाठी प्रा . शिंदे यांनी लक्ष घालावे. शहर विकासासाठी आपल्या पदाच्या माध्यमातून सरकारच्या वतीने जास्तीत जास्त मदत व निधी माझ्या अहिल्यानगर शहरासाठी मिळवून द्यावा असे काळे यांनी म्हटले आहे.
तर बाजारपेठेला गतवैभव मिळेल :
उद्योग वाढीमुळे शहराच्या बाजारपेठेला देखील भरभराट, गतवैभव मिळू शकेल. व्यापाऱ्यांची व्यापार वृद्धी होऊ शकेल. पेन्शनर्स लोकांचे शहर आणि सततच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे शहराचा झालेला बदलौकिक पुसून सुसंस्कृत, शांतता असणारे, सर्व पायाभूत सोयी सुविधांनी विकसित शहर निर्मितीसाठी माझा आपल्याकडे आग्रह असल्याचे किरण काळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com