Molana Azad School | मौलाना आझाद हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ
Molana Azad School | नगर : दर्शक -
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीही तितकीच आवश्यक आहे.
क्रीडा स्पर्धा विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबरोबरच जिद्द, चिकाटी आणि विजय-पराजय स्वीकारण्याची वृत्ती निर्माण करतात. या स्पर्धांमधूनच उद्याचे सक्षम नागरिक आणि आदर्श नेतृत्व घडत असते. मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, त्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांनी केले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर येथे सालाबादप्रमाणे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध संचलन करत क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधले. डॉजबॉल स्पर्धेची औपचारिक सुरुवात संस्थेचे अध्यक्ष शेखलाल, उपसचिव अजीज जनाब, शरफोद्दीन शेख व सलीम भाई यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा फरीदा भाभी या उपस्थित होत्या.
क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना नाज यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हासिब शेख, यास्मिन बाजी, नाजेमा बाजी, बहार अंजुम, मिनाज बाजी, अंजुम खान आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी बहार अंजुम यांनी आभार प्रदर्शन केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com