Vanchit Nagar | जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार; महापालिकेचे रणशिंग फुंकले
नगर : दर्शक |
नगर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांत प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का देत वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, समविचारी पक्षांसोबत अथवा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये नव्याने निवडून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पाच नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जामखेड नगरपरिषदचे नगरसेवक ॲड. अरुण जाधव व संगीताताई भालेराव, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे संतोष चोळके तसेच संगमनेर नगरपरिषदेचे अमजदखान पठाण व विजयाताई गुंजाळ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. याप्रसंगी राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी ग्रामीण भागात मिळालेल्या यशाचा उल्लेख करत, आता अधिक ताकदीने आणि जिद्दीने महानगरपालिकेतही पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी सांगितले की, सर्वसामान्य, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्ष आगामी महापालिका निवडणूक लढवणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे होते. वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा, शहर, तालुका तसेच युवा आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याशिवाय भारतीय बौद्ध महासभा, पारनेर तालुका कार्यकारिणी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीनेही नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक ९-क मधून शोभा आल्हाट यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोपट जाधव यांनी मानले. यावेळी सुहास धीवर, मनोज साळवे, शोभा आल्हाट तसेच भंते सुमित बोधी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जे डी शिरसाठ जिल्हा सल्लागार, सुधीर ठोंबे,हनीफ शेख शहराध्यक्ष,
सोमनाथ भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष,प्रवीण ओरे शहर महासचिव,राजीव भिंगारदिवे भिंगार शहराध्यक्ष, योगेश क्षीरसागर,गणेश राऊत,संकेत शिंदे,शोभा आल्हाट,दिव्या साळवे, मदीना पठाण,सीमा आल्हाट,गौरव आल्हाट,रोहित आल्हाट,विशाल साळवे,दीपक ससाणे, वैभव मोकळ,
पिंटू साळवे, फैरोज पठाण,रियाज शेख,प्रतीक ठोकळ,देविदास भालेराव, सुहास धिवर,विवेक कसबे,बाळासाहेब गायकवाड,मनोज साळवे, प्रशांत छजलानी,विकास गायकवाड, जय कदम, गणेश पोळ आदीसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक ताकद आणि तयारी दाखवून दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com