Top News

दिव्यांगांची सेवा अविरत चालूच राहणार : अक्षय कर्डीले

ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीच्या वाटपातून शेंडीतील दिव्यांगांना दिलासा

दिव्यांगांची सेवा अविरत चालूच राहणार : अक्षय कर्डीले



नगर : दर्शक 
प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वार्षिक महसुलातून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना किमान पाच टक्के निधीचे वाटप करणे आवश्यक असून, ही जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आणि काटेकोरपणे पार पाडली पाहिजे. दिव्यांग व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो, त्यांना न्याय मिळायलाच हवा, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा युवानेते पै. अक्षयदादा कर्डीले यांनी केले.


शेंडी (ता. नगर) येथे अक्षयदादा कर्डीले यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बंधू-भगिनींना ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या विविध योजना, निधी व सुविधा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीची सामूहिक जबाबदारी आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुढील काळातही दिले जाईल. कर्डीले परिवाराच्या माध्यमातून दिव्यांगांची सेवा अखंडपणे सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




अक्षयदादा कर्डीले पुढे म्हणाले की, स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत गोरगरीब, उपेक्षित व दिव्यांग घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोणताही दिव्यांग व्यक्ती समस्या घेऊन गेल्यास त्याची अडचण प्रथम प्राधान्याने सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही असत. संजय गांधी निराधार अनुदान समिती असो वा दिव्यांगांचे पदवाटप व सहाय्याचे काम असो, प्रत्येक विषयात त्यांनी बारकाईने लक्ष घालून निर्णय घेतले. त्यांच्या आशीर्वादानेच सर्वसामान्य, गोरगरीब व दिव्यांगांची सेवा पुढील काळातही अविरत सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.




यावेळी भाजपा दिव्यांग जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, स्व. आमदार कर्डीले साहेब यांच्या माध्यमातून मला दोन वेळा जिल्हाध्यक्षपदाची तसेच तीन वेळा संजय गांधी निराधार अनुदान समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक संधीचा उपयोग गोरगरीब व दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कर्डीले परिवाराचे आमच्यावर असलेले प्रेम व ऋण कधीही फेडता येणार नाही. सुमारे तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी स्व. आमदार कर्डीले साहेब यांच्या शुभहस्ते दिव्यांगांना वस्तूंचे वाटप करण्यात आले होते, त्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.


शेंडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रयागाताई लोंढे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना नेहमीच सहकार्य केले जाते. मागील काही महिन्यांपासून सदर निधी व वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र स्व. आमदार कर्डीले साहेब यांच्या दुःखद निधनामुळे कार्यक्रम घेणे उचित वाटत नव्हते. तथापि, येत्या काळात दरवर्षी नियमितपणे दिव्यांगांसाठी राखीव निधीचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


या कार्यक्रमास मांजरसुबा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जालिंदर कदम, शेंडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनील देठे, उस्मान शेख, माजी उपसरपंच अविनाश शिंदे, रमेश देठे, ग्रामसेवक अशोक बोरुडे, नागरदेवळे येथील यशवंत पानमाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ, दिव्यांग बंधू-भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि दिव्यांगांच्या सन्मानासाठी सुरू असलेली सेवा भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
   कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य सुनील देठे यांनी मानले. 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने