मोबाईलपासून दूर राहण्यासाठी खेळ आवश्यक – सुदाम बटुळे
नगर : दर्शक ।
सावेडी येथील श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित क्रीडा प्रात्यक्षिके व क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे हे उपस्थित होते, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक सावेडी विभागाचे शाला समिती चेअरमन मा. ॲड. श्री. किशोर देशपांडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात समर्थ पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आकाशात उंच भरारी घेणारे फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख अतिथी सुदाम बटुळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात मोबाईलपासून दूर राहण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते तसेच शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. विद्यार्थ्यांनी नियमितपणे क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांना संचलनातून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका सौ. वसुधा जोशी मॅडम यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी प्रा. सौ. प्राजक्ता केसकर मॅडम यांनी करून दिला. क्रीडा अहवालाचे वाचन क्रीडा शिक्षक श्री. पोपट लोंढे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रात्यक्षिकांतून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. यामध्ये योगासने, मानवी मनोरे, गाण्याच्या ठेक्यावर सादर केलेला योगा, मल्लखांब मधील चित्तथरारक कसरती विशेष आकर्षण ठरल्या. तसेच टिपऱ्या, लेझीम, लोकगीत, तलवारबाजी व स-साहित्य कवायत सादर करण्यात आली.
यानंतर माननीय अतिथी व अध्यक्षांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रग्बी, खो-खो, कबड्डी तसेच इतर क्रीडा प्रकारांत विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, संस्थेच्या सदस्या सौ. संध्या कुलकर्णी, सदस्य स्वप्निल कुलकर्णी, सदस्य सुनिल जोशी, समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनिल कानडे, प्राथमिक विभाग सांगळे गल्लीचे मुख्याध्यापक अजय महाजन, सावेडी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर, माध्यमिक पर्यवेक्षक श्री. एल. एम. कुलकर्णी, स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी सुनिल रायकर, शिक्षकेतर प्रतिनिधी नानासाहेब जोशी, विनीत कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका बोठे मॅडम व श्रीमती प्रियंका कासार यांनी केले, तर प्रा. सौ. शिल्पा कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com